बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

मुंबई विमानतळावरील जय हरी

               



 
     प्रवासाची  जवळ जवळ  सर्व तयारि पूर्ण होत आली. अगदी सुटकेस सुद्धा नवीन घेतली , सामान खरेदी , आणि विशेष म्हणजे सौ चे वेगळेच टुमणे " अहो तिकडे पोरांना आपल्याकडचे पदार्थ मिळत नाहीत आपण ते बरोबर घेऊन जाऊ . " मी " अग ! पण आपल्याला ते अलाऊड आहे कि नाही ते विचारावे लागेल ."
" मोठ्या ब्यागेत टाकले तर कोण विचारतो . "
"अग तसे नाही ती ब्याग सुद्धा  स्क्यान होते आणि आत काय आहे त्यांना कळते . "आणि मी यु ट्यूब वर बघितले होते कि कोणी काही फळे जरी नेली आणि ती सापडली कि काही हजार डॉलर दंड भरावा लागला . आणि असे बरेच काही बघितले असल्यामुळे मला आपली उगीचच भीती वाटायची . त्यावर गणेशाचा फोन आला आणि  सर्व सविस्तर विचारले त्याने ज्या गोष्टी अलाऊड नाहीत त्याची यादी पाठविली आणि सांगितले कि तुम्ही जे काही पदार्थ (dry ) आणणार आहात त्याची एक यादी वर तुमच्याजवळ ठेवा आणि सीड्स असलेले कोणतेही फळ न्यायाची परवानगी नाही . त्याच्या सूचनाबरहुकूम सर्व सामान ब्यागेत भरले . फॉरेनला जाण्याची कल्पनाच किती सुखावणारी असते ना ! 
                   २६ ऑक्टोबर २०१५ ला आम्ही विमानतळावर  सकाळी साधारणपणे सहा वाजता जायला हवे होते कारण तीन तास अगोदर जावे लागते म्हणजे चेक इन वगैरे व्हयला सुरळीत होते . सकाळी ९. ५० ला विमान सुटणार होते . दोन दिवस अगोदर योगेश आमचा मोठा मुलगा ब्यांगलोरहून व नारायणप्रसाद सर्वात धाकटा मुलगा पुण्याहून घरी आला त्याने आमच्या व्यागणारला कॅरिअर बसवण्यापासून सगळी कामे केली . आता जानेवारी-१६ पर्यंत गाडी त्याच्याकडेच राहणार होती. ब्यागांचे वजन करून आणले नियमाप्रमाणे सर्व व्यवस्थित झाले . पासपोर्ट, तिकीटाची ऑनलाईन कॉप्या , व्हिसा , व इतरही  आय डी प्रूफ ,पैसे, त्यात काही ऑस्ट्रेलियन डॉलर व काही भारतीय चलन बरोबर घेतले . योगेशने महत्वाच्या सूचना  दिल्या व सर्व कागदपत्रे व्यवस्थित चेक करून नीट लावून दिले .
           २५ तारखेलाच सकाळी निघालो नारायण ड्रायविंगला होता त्यामुळे काळजी नव्हती . गाव सोडतांना मात्र भरून आले नातेवाईक " काळजी घ्या , विमानात व्यवस्थित बसा " असा आस्थेवाईक सल्ला देत होते पण ! यांना सुद्धा  सोडून जायचे सुद्धा जीवावर आले . आणि नारायणाने गाडी सुरु केली आणि " चला जास्त इमोशनल होऊ नका , तिकडे जाऊन मजा करा ." असा पोक्त ! सल्ला म्हणजे  . इशारा दिला . माळशेज घाटातून निसर्ग नजरेच्या कवेत भरून भरून घेत होतो . कल्याणला पोहचलो  नारायणाचे मित्र श्री देशपांडे यांच्या एका मोकळ्या फ्लॅटवर मुक्काम केला.   नारायणाची पत्नी सौ पूजा पण आमचे बरोबर होती रात्रीचे जेवण हॉटेलवरच घेतले .व पुन्हा फ्लॅटवर आलो व पुन्हा कागदपरासह सर्व चेक केले आणि १२ वाजता झोपलो व सकाळीच ३ वाजता उठून फ्रेश झालो आणि " छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे " आम्ही चौघेही निघालो एवढ्या पहाटे निघूनही पाहतो तो रस्त्याने गर्दी होतीच " मुंबईला दिवस रात्र झोप नाही हेच खरे ." विमान तळावर पोहोचलो नारायण गाडी पार्क करायला गेला आम्ही त्या भव्य अशा विमानतळाचे निरीक्षण करीत उभे राहिलो . नारायण आल्यानंतर त्याने दोन ट्रॉलीज आणल्या त्यावर सामान ठेवले आणि आता तिथून आम्हालाच आत जावे लागणार होते .... योगेश, नारायण आणि पूजाकडे बघितले मात्र माझा व सौ चा बांध सुटला खूप रडायला यायला लागले ममत्व मोठे कठीण असते . थोड्या कालावधीसाठी सुद्धा त्यांना सोडणे कठीण होऊन बसते. मुले जरी मोठी झाली असली तरी ती आई वडिलांना लहानच असतात .... मन तादात्म्य लवकर सोडीत नाही . " नाही कुणाचे कुणी , तुझे नव्हे रे कोणी ।" हे जरी माहित असले तरी कोणीतरी आपले आहे असे वाटतच असते .दोन्ही मुले जवळ येऊन समजावून सांगू लागले . हाही एक वेगळा अनुभव आहे , मुले आता मोठी झाल्यासारखे वाटू लागले . नारायण आम्हाला लटकेच रागावला " जा आता ! तुम्हाला वेळेत कागदपत्रे चेक करायची आहेत . " आणि आम्ही पुढे सरकलो . तीन नंबरच्या टर्मिनलमधून जायचे होते गेटवर पोलीस अधिकारी होता त्याला पासपोर्ट, व्हिसा दाखवला व त्याने आत सोडले . आता खरी गम्मत येथेच होती आम्हाला काहीच माहिती नाही आणि मी नेट वरील बरेच व्हिडीओ बघून माहिती घेतली होती तरी पण इथे मात्र माणूस गडबडतो . समोरच्या काउंटरवरच्या ऑफीसरने  अगदी मराठीत हाक मारली , " इकडे या !" एकदम हायस वाटले माय मराठी इथे कमला आली . खूप बरे वाटले. त्याला तिकीटाची कॉपी व व्हिसा , पासपोर्ट दाखवले त्याने लगेच आमच्या मोठ्या बागा जमा करून घेतल्या आणि त्या ब्यागा साईडच्या पट्ट्यावर ठेवल्या त्याबरोबर त्या ब्यागा पुढे सरकून विमानात ठेवण्यासाठी गेल्या त्यांची सकॅनिंग होऊनच पुढे जात असतात . त्या ऑफिसरने आम्हाला " बोर्डिंग पास " दिले व सांगितले कि " तुम्हाला व्हील चेअर अलाऊड केलेली आहे त्यामुळे तुम्ही एक माणूस व्हील चेअर घेऊन येईल त्याचे बरोबर जा . "  कित्ती बरे वाटले  हे ऐकून ! खरे तर हि युक्ती गणेशाची त्याने बुकिंग करंतानाच मला हृदयाचा त्रास असल्याचे नमूद केले त्यामुळे मला व्हील चेअर मिळाली . खरा फायदा वेगळाच  होता आम्हाला आता डोके ना चालवता तो व्हील चेअरवालाचं नेमक्या ठिकाणी नेणार होता . 
                   व्हील चेअरवर बसलो व त्या माणसाने बरोबर चेक इन च्या गेटवर नेले तेथे आमची गळ्यातील ब्याग ,.मोबाईल ल्याप टॉप बॅग तपासली व आम्हालाही तपासणीच्या चौकटीतुन जावे लागले सगळे सुरळीत झाले . आता फक्त शेवटचा टेबल राहिला होता तेथे पासपोर्टवर शिक्का मारून देतात त्या माणसाने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला " जय हरी महाराज !" अरेच्या ! मी तर चकितच झालो ," तुम्ही मला जयहरी म्हणालात आता मला प्रवासात काही काळजी नाही  , म्हणजे इथेसुद्धा जय हरी आहेत तर !" तो म्हणाला ," अहो ! महाराज मी तुमचे फोटो आणि खूपसे लेख फेस बुकवर वाचले आहेत व मी तुम्हाला लगेच ओळखले . अहो आमचा वारकरी !परदेशी जातोय तो तेथे जाऊन भागवत धर्माचा प्रचार करणारच . तुम्हाला  प्रवासास माझ्या शुभेच्छा !." मी त्यांना धन्यवाद म्हणालो . मी त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही प्रत्यक्ष बघितले नव्हते पण फक्त फेसबुकच्या मैत्रीचा हा असा धागा जुळला गेला .... ह्या ऋणानुबंधाच्या गाठी असतात . परमार्थ असाही उपयोगाला येतो हे खरे आहे . आमचे हे सर्व कामे ८ वाजेपर्यंत उरकली होती . नारायणाला फोन केला त्याला सांगितले कि " सर्व व्यवस्थित झाले आहे तुम्ही आता गेलात तरी चालेल , " तो म्हणाला तुम्ही विमानात बसल्यावर आम्ही जाऊ ." व्हील चेअरवाल्याने आम्हाला जेथे आमचे विमान येते तेथे आणून सोडले व त्याने सांगितले कि विमान आले कि लगेच अनाऊन्सिंग होईल मग बोर्डिंग पास  आणि पासपोर्ट दाखवून तुमच्या जागेवर बसायचे . नेहमीप्रमाणे त्याने आमच्याकडे जरा अपेक्षेने बघितले मी म्हंटले जाऊद्या आता वाद नको शंभर रुपये त्याच्या हातावर ठेवले तो एकदम खुश झाला आम्हाला जय हरी करून गेला . आता  आमच्याकडे जवळ जवळ दीड तास होता तेव्हा सौ ला म्हणालो कि आपण आता विमानतळ बघून घेऊ .. आणि क्रमश: 

बुधवार, ११ मे, २०१६

पूर्वतयारी -३

                                                          

                   
                       परदेशी जायचे म्हटले कि पूर्वतयारी फार महत्वाची . अहो !कुठेही जा पूर्वतयारीशिवाय जाणे काही योग्य नाही . पासपोर्ट तर आलेले होते पण तिकडे जयायचे म्हणजे " व्हिसा" नावाचे एक महत्वाचे प्रकरण आहे . आम्ही TRAVEL MASTERS (MUMBAI) PV - branch pune यांचे मार्फत व्हिसाचे कागदपत्रे देण्याचे ठरवले . त्यासाठी  बँक अकौंटची सर्व माहिती , तुम्ही काही एफ डी वगैरे केले असेल तर त्याचे सविस्तर माहिती , घराचा ७/१२ , जमिनीचा ७/१२ , आई डी प्रूफ , हे सर्व आवशक असते आम्ही सर्व कागदपत्रे जमा केली अर्थात आपल्याकडे कोणत्याही कार्यालयात इतक्या सहज काहीच मिळत नसते , तो अनुभव मलाही आला पण ! ते सर्व कागदपत्रे मिळविली  आणि मला तर गड जिंकल्यासारखे झाले . सर्व कागदपत्रांचे स्क्यानिंग करून एजंटकडे ई मेलने पाठवली आणि त्यांनी Australian Government,  Department of Immigration and Border Protection यांच्याकडे पाठवली ती नेमकी डिसेंबर २०१४ मध्ये सदर केली होती आणि तो महिना नेमका नाताळचा असल्यामुळे आमच्या पथ्यावर पडले , कारण त्यांच्याकडे नाताळ अगदी राष्ट्रीय सण असल्यासारखा असतो त्यामुळे लवकरच व्हिसा मंजूर झाला . २४ डिसेंबर २०१४ ते २४ डिसेंबर २०१६ पर्यंत आम्हाला दोन वर्षाचा व्हिसा मंजूर करण्यात आला . 
                   आमची तर तयारी झाली अगदी मी माझ्या मित्र मंडळीला पण सांगितले कि आम्ही आता लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहोत . परंतु नेमके काही अडचणी उभ्या राहिल्या " श्रेयांसि बहु विघ्नानि " आणि आमचे ऑस्ट्रेलियाला जाणे लांबले. मन फार खिन्न झाले पण नाईलाज होता . वेळ आल्याशिवाय काहीच घडत नाही हेच खरे . मनात असेही वाटले कि आपले काही जाणे होत नाही . पण गणेश म्हणायचा  " अण्णा तुम्हाला यावेच  लागेल , तुम्ही तसे काही वाटून देवू नका " मनात इतके ठरवूनही जर ठरवलेले घडले नाही तर फार मनस्ताप होतो . आणि वाट पाहणे हे तर फार त्रासदायक . जवळ जवळ ७-८ महिने असेच गेले आणि गणेशाचा फोन आला तो म्हणाला ," आण्णा ! मी तुमचे टिकेट बुकिंगसाठी एजंटला सांगितले आहे . आता तुम्ही तयारीला लागा …… " मग मात्र पुन्हा हुरूप आला पण यावेळी ठरवले कि प्रत्यक्ष विमानतळावर गेल्याशिवाय कोणालाही काही बोलायचे नाही . आमचे तिकीट सुद्धा कन्फर्म झाले .२६ ऑक्टोंबर २०१५ ते रिटर्न ७जानेवारी २०१६ . मुंबई ते सिंगापूर जेट एअरने व तेथून पुढे quantas एअरलाईनने मेलबोर्न पर्यंत असा एकदंदर १४तासांचा प्रवास . या दोन विमान कंपनीचा करार असल्यामुळे असा हा ब्रेक जर्नी . तिकिटे ऑन लाईन मिळाली . आता खरी आमची लगबग सुरु झाली . 
                  परेदशी राहायचे म्हटल्यावर त्याप्रमाणे कपडे घेणे आले अगदी ३/४ , टी शर्ट , सुटकेस औषधे , नेहमी लागणारे पदार्थ अर्थात कुठल्याही प्रकारचे " बीज " असलेले पदार्थ तिकडे नेता येत नाहीत , बुटाची माती सुद्धा साफ केलेली असावी लागते laptop , व्हिडीओ क्यामेरा , मोबईल काही मिठाई व खाण्याचे पदार्थ असे सगळे यादीप्रमाणे झाले . प्रत्येकी २७ किलो वजन सुटकेसमध्ये अलाउड (मंजूर) होते laptop ची ब्याग आणि पर्स त्या वजनात धरीत नाही हे तुम्हाला जवळ ठेवता येते . बाकी मोठी सुटकेस त्यांच्या ताब्यात असते ती विमानात लगेजमध्ये सुरक्षित असते . 
               जस जसे दिवस जवळ येत चालले तस तसे मनात कुठेतरी हुरहूर वाटायला लागली . हृदयात आपली मातृभूमी सोडून जाण्याचे अनामिक दुख: सुधा वाटायला लागले नातेवाईक व पारमार्थिक प्रेमी लोक सगळे भेटायला येऊ लागले आणि उगीचच भावनाशीलता होऊ लागली , डोळे भरून यायचे पुन्हा सगळ्यांच्या भेटी होतील का ? विमानाचे अपघात वगैरे ऐकत आलेलो असल्यामुळेहि असे काहीतरी उगीचच वाटायला लागले अर्थात हा मनाचा एक खेळच …" मन चिंती ते वैरी न चिंती " हे म्हणतात ते खरे आहे . 


क्रमश: 

ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,जंगल , समुद्र , प्राणी, पक्षी , लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सादर करीत आहे . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.  

सोमवार, २ मे, २०१६

पूर्वतयारी -२

                                                    

          

                   गणेश पहिल्यांदा कोर्ससाठी म्हणून इंग्लंडला गेला तेव्हा त्याला पोहचवण्यासाठी मुंबईला विमानतळावर गेलो .  आयुष्यात प्रथमच विमानतळ बघितले ती भव्य इमारत आणि वेगवेगळ्या विमान  कंपनीच्या गेटवरची गर्दी . व प्रवाशांची लगबग , परदेशी प्रवाशी, पायलट व एयर होस्टेस यांची धावपळ बघितल्यावर टर्मिनलच्या आतमध्ये कसे असेल याची फक्त कल्पना करू शकत होतो . जेव्हा गणेश त्याची ब्याग घेऊन गेटवर गेला तेव्हा आम्हाला आत येऊ दिले नाही , सेक्युरिटीने आत जाता येणार नाही हे सांगितले . फार वाईट वाटले . आम्ही सर्वच त्याला निरोप देण्याकरिता तेथे होतो … डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबत नव्हते सौ अनुराधा तर अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होती . . आमच्या घरातील परदेशी जाणारा गणेश दुसरा होता. माझे वडील मराठा लाईट इनफंट्री मध्ये असतांना ते जपानला गेले होते त्यानंतर गणेश इंग्लंडला निघाला होता . आमच्यासाठी तो अविस्मरणीय क्षण होता . तो समोरच्या काचेमधून दिसत होता , इमिग्रेशनच्या टेबलजवळ होता तोपर्यंत दिसला नंतर पुढच्या क्षणी तो आणखी आत गेला मग फक्त फोनवर बोलणे झाले आणि तो विमानात बसला तेव्हा त्याचा एक फोन आला , मला फोनवर बोलताच  येईना गळा भरून आला डोळ्यातून घळघळा अश्रू ओघळतच होते . हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही .
                 गणेश वारंवार परदेशी जातच होता मग मात्र काहीच वाटत नव्हते कारण ल्यापटॉपवर व्हिडीओवर बोलणे नेहमीच व्हायचे .मलेशियाला असतांना तो मला नेहमी म्हणायचा कि " आण्णा मी इथे आहे तोपर्यंत तुम्ही येउन जा " मी हो  म्हणालो, आणि पासपोर्टच्या तयारीला लागलो  तेव्हा मी पाटबंधारे खात्यामधे सरकारी सेवत होतो व् पस्पोर्टचा टेबल माझ्याकडेच होता  . मी लगेच तयारीला लागलो  . पासपोर्टसाठी लागणारे कागदपत्रे  , पासपोर्ट फोटो तेही  विशिष्ठ साइजमधेच , शाळा सोडल्याचा दाखला, नोकरीत असल्याचा दाखला , ऐसे सर्व कागदपत्रे एजेंटकड़े दिल आणि त्याने ते ऑनलाइन भरले , व् नंतर महिनाभरात पोलिस चौकशी वगैरे सोपस्कार पर पडले आणि फ़क्त माझा एकट्याचाच पासपोर्ट आला माझ्या पत्नीचा नहीं आला त्यामुळे मलेशियाला  जाता आले नाही  . तो पासपोर्ट दोन महिन्यांनी आला . पण तोपर्यंत आमचा मूड पण राहिला नव्हता .
                     मालेशियानंतर गणेश ऑस्ट्रेलियाला गेला आणि तेथे चांगला स्थिरावला व त्याचे पुन्हा सुरु झाले , " आण्णा आता मात्रा आई आणि तुम्ही इकडे आलेच पाहिजे . " तो मेलबर्न येथे राहत होता . आमचे पुन्हा परदेश वरची तयारी सुरु झाली . पासपोर्ट तर होतेच आता व्हिसा महत्वाचा होता त्यासाठी पुन्हा कागद पत्रे गोळा करणे आलेच . त्यातच माझी एप्रिल २०१३ मध्ये बायपास झालेली आणि नातेवाईक म्हणायचे " कशाला धाडस करता ? लांबचा पल्ला आहे विमानात १३-१४ बसायचे , तुम्हाला जमेल का ? " पण तुम्हाला सांगू का मी बायपास झाल्यानंतर मी वृंदावनाला सात दिवस भागवत साप्ताह केला तेव्हा तो प्रवास मला काहीही त्रासदायक वाटला नाही त्यानंतर द्वारकेला सुद्धा सात दिवस साप्ताह केला काहीही त्रास झाला नाही . त्यामुळे मला धाडस आलेले होतेच शिवाय भगवंतावर पूर्ण विश्वास . ……क्रमश:


ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सादर करीत आहे . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.

पूर्वतयारी -१

                                                   
गणेश
          २५ वर्षापूर्वी माझ्या ऑफीसमध्ये एक काशीचा जोतिषी आला होता तो भविष्य सांगत होता . सर्वांचे भविष्य सांगून झाल्यावर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला " तुमचे भविष्य सांगू का ?" 
" नको सांगूस ! माझा विश्वास नाही भविष्यावर "
 "असू द्या साहेब ! ऐकून घ्यायला काय हरकत आहे का ? मी तुम्हाला खात्रीने सांगतो , तुम्हाला परदेश प्रवास घडणार आहे ."
"छे काहीतरीच काय सांगतो ? मी साधा कारकून माणूस आणि मी कशाचा परदेशी जातोय ? तू आपला मला खुश करण्यासाठी सांगत असशील तर ते मी समजू शकतो . "
नाही साहेब तुम्हाला माझ्या शब्दाची नंतर आठवण येईल . "
     मी आपले त्याचे ऐकून घेतले त्याला दहा रुपये दिले , जाऊद्या म्हटले लांबून आलेला माणूस आहेतो हि निघून गेला परत मला कधीही दिसला नाही . त्याचे भविष्य विसरूनही गेलो .
           मला तीन मुले आहेत त्यापैकी गणेश शिक्षणात जेमतेमच होता . पण स्वभावाने शांत आणि सेवाधारी . त्याचे कसे होईल अशी मला नेहमी चिंता असायची . एकदा आमचे घरी करवीरचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती तीर्थ स्वामी महाराज आले होते . गणेशने त्यांची खूप सेवा केली आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला " गणेश तुझे कल्याण होईल " मी म्हणालो स्वामी आता माझी चिंता मिटली . असो हा झाला श्रद्धेचा भाग प पू गुरुवर्य श्री चंपामाईचाहि आशीर्वाद होता . प्रयत्न आणि परिश्रम याची जोड जमली कि भाग्य बदलते . " भाग्याचेनी भडसे । उद्यामाचेनी मिसे । संपतीजात आपैसे । घर रिघे ।।" असे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात . तसे काहीसे गणेशचे झाले . दहावीनंतर dairy science and husbandryचा  कोर्स केला आणि जनवराचा डॉक्टर म्हणून मोटार सायकलला निळ्या झाकणाचा थर्मास लावून आमच्या गावाच्या आसपासची गावे फिरून शेतकऱ्यांची जनावरे तपासणे , त्यांना उपचार करणे. हा उपक्रम दोन तीन वर्षे केला                    
                  आमचे जेष्ठ चिरंजीव  योगेश हा पुण्याला होता तो फर्ग्युसन महाविद्यालात एम ए (इंग्रजी) होऊन  फोटोग्राफी करत होता .,  त्याने गणेशाला पण पुण्याला पाठवावे असा आग्रह धरला . आमचा थोडा विरोध होता पण त्याने ऐकले नाही …. गणेशाला त्याने पुण्याला नेले आणि लोणावळ्याच्या  रेसाकोर्समध्ये नोकरीला लावून दिले आणि तेथून पुढे गणेशाने भयंकर संघर्ष , कष्ट केले आणि त्याचे फलित म्हणून कि काय तो इंग्लंड ,, फ्रांस , स्विझर्लंड , मलेशिया आणि शेवटी ऑस्ट्रेलिया पर्यंत फेरीयर म्हणून करियर केले आणि आता तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक झाला आहे .  क्रमश: …


ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सदर करीन . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.