प्रवासाची जवळ जवळ सर्व तयारि पूर्ण होत आली. अगदी सुटकेस सुद्धा नवीन घेतली , सामान खरेदी , आणि विशेष म्हणजे सौ चे वेगळेच टुमणे " अहो तिकडे पोरांना आपल्याकडचे पदार्थ मिळत नाहीत आपण ते बरोबर घेऊन जाऊ . " मी " अग ! पण आपल्याला ते अलाऊड आहे कि नाही ते विचारावे लागेल ."
" मोठ्या ब्यागेत टाकले तर कोण विचारतो . "
"अग तसे नाही ती ब्याग सुद्धा स्क्यान होते आणि आत काय आहे त्यांना कळते . "आणि मी यु ट्यूब वर बघितले होते कि कोणी काही फळे जरी नेली आणि ती सापडली कि काही हजार डॉलर दंड भरावा लागला . आणि असे बरेच काही बघितले असल्यामुळे मला आपली उगीचच भीती वाटायची . त्यावर गणेशाचा फोन आला आणि सर्व सविस्तर विचारले त्याने ज्या गोष्टी अलाऊड नाहीत त्याची यादी पाठविली आणि सांगितले कि तुम्ही जे काही पदार्थ (dry ) आणणार आहात त्याची एक यादी वर तुमच्याजवळ ठेवा आणि सीड्स असलेले कोणतेही फळ न्यायाची परवानगी नाही . त्याच्या सूचनाबरहुकूम सर्व सामान ब्यागेत भरले . फॉरेनला जाण्याची कल्पनाच किती सुखावणारी असते ना !
२६ ऑक्टोबर २०१५ ला आम्ही विमानतळावर सकाळी साधारणपणे सहा वाजता जायला हवे होते कारण तीन तास अगोदर जावे लागते म्हणजे चेक इन वगैरे व्हयला सुरळीत होते . सकाळी ९. ५० ला विमान सुटणार होते . दोन दिवस अगोदर योगेश आमचा मोठा मुलगा ब्यांगलोरहून व नारायणप्रसाद सर्वात धाकटा मुलगा पुण्याहून घरी आला त्याने आमच्या व्यागणारला कॅरिअर बसवण्यापासून सगळी कामे केली . आता जानेवारी-१६ पर्यंत गाडी त्याच्याकडेच राहणार होती. ब्यागांचे वजन करून आणले नियमाप्रमाणे सर्व व्यवस्थित झाले . पासपोर्ट, तिकीटाची ऑनलाईन कॉप्या , व्हिसा , व इतरही आय डी प्रूफ ,पैसे, त्यात काही ऑस्ट्रेलियन डॉलर व काही भारतीय चलन बरोबर घेतले . योगेशने महत्वाच्या सूचना दिल्या व सर्व कागदपत्रे व्यवस्थित चेक करून नीट लावून दिले .
२५ तारखेलाच सकाळी निघालो नारायण ड्रायविंगला होता त्यामुळे काळजी नव्हती . गाव सोडतांना मात्र भरून आले नातेवाईक " काळजी घ्या , विमानात व्यवस्थित बसा " असा आस्थेवाईक सल्ला देत होते पण ! यांना सुद्धा सोडून जायचे सुद्धा जीवावर आले . आणि नारायणाने गाडी सुरु केली आणि " चला जास्त इमोशनल होऊ नका , तिकडे जाऊन मजा करा ." असा पोक्त ! सल्ला म्हणजे . इशारा दिला . माळशेज घाटातून निसर्ग नजरेच्या कवेत भरून भरून घेत होतो . कल्याणला पोहचलो नारायणाचे मित्र श्री देशपांडे यांच्या एका मोकळ्या फ्लॅटवर मुक्काम केला. नारायणाची पत्नी सौ पूजा पण आमचे बरोबर होती रात्रीचे जेवण हॉटेलवरच घेतले .व पुन्हा फ्लॅटवर आलो व पुन्हा कागदपरासह सर्व चेक केले आणि १२ वाजता झोपलो व सकाळीच ३ वाजता उठून फ्रेश झालो आणि " छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे " आम्ही चौघेही निघालो एवढ्या पहाटे निघूनही पाहतो तो रस्त्याने गर्दी होतीच " मुंबईला दिवस रात्र झोप नाही हेच खरे ." विमान तळावर पोहोचलो नारायण गाडी पार्क करायला गेला आम्ही त्या भव्य अशा विमानतळाचे निरीक्षण करीत उभे राहिलो . नारायण आल्यानंतर त्याने दोन ट्रॉलीज आणल्या त्यावर सामान ठेवले आणि आता तिथून आम्हालाच आत जावे लागणार होते .... योगेश, नारायण आणि पूजाकडे बघितले मात्र माझा व सौ चा बांध सुटला खूप रडायला यायला लागले ममत्व मोठे कठीण असते . थोड्या कालावधीसाठी सुद्धा त्यांना सोडणे कठीण होऊन बसते. मुले जरी मोठी झाली असली तरी ती आई वडिलांना लहानच असतात .... मन तादात्म्य लवकर सोडीत नाही . " नाही कुणाचे कुणी , तुझे नव्हे रे कोणी ।" हे जरी माहित असले तरी कोणीतरी आपले आहे असे वाटतच असते .दोन्ही मुले जवळ येऊन समजावून सांगू लागले . हाही एक वेगळा अनुभव आहे , मुले आता मोठी झाल्यासारखे वाटू लागले . नारायण आम्हाला लटकेच रागावला " जा आता ! तुम्हाला वेळेत कागदपत्रे चेक करायची आहेत . " आणि आम्ही पुढे सरकलो . तीन नंबरच्या टर्मिनलमधून जायचे होते गेटवर पोलीस अधिकारी होता त्याला पासपोर्ट, व्हिसा दाखवला व त्याने आत सोडले . आता खरी गम्मत येथेच होती आम्हाला काहीच माहिती नाही आणि मी नेट वरील बरेच व्हिडीओ बघून माहिती घेतली होती तरी पण इथे मात्र माणूस गडबडतो . समोरच्या काउंटरवरच्या ऑफीसरने अगदी मराठीत हाक मारली , " इकडे या !" एकदम हायस वाटले माय मराठी इथे कमला आली . खूप बरे वाटले. त्याला तिकीटाची कॉपी व व्हिसा , पासपोर्ट दाखवले त्याने लगेच आमच्या मोठ्या बागा जमा करून घेतल्या आणि त्या ब्यागा साईडच्या पट्ट्यावर ठेवल्या त्याबरोबर त्या ब्यागा पुढे सरकून विमानात ठेवण्यासाठी गेल्या त्यांची सकॅनिंग होऊनच पुढे जात असतात . त्या ऑफिसरने आम्हाला " बोर्डिंग पास " दिले व सांगितले कि " तुम्हाला व्हील चेअर अलाऊड केलेली आहे त्यामुळे तुम्ही एक माणूस व्हील चेअर घेऊन येईल त्याचे बरोबर जा . " कित्ती बरे वाटले हे ऐकून ! खरे तर हि युक्ती गणेशाची त्याने बुकिंग करंतानाच मला हृदयाचा त्रास असल्याचे नमूद केले त्यामुळे मला व्हील चेअर मिळाली . खरा फायदा वेगळाच होता आम्हाला आता डोके ना चालवता तो व्हील चेअरवालाचं नेमक्या ठिकाणी नेणार होता .
व्हील चेअरवर बसलो व त्या माणसाने बरोबर चेक इन च्या गेटवर नेले तेथे आमची गळ्यातील ब्याग ,.मोबाईल ल्याप टॉप बॅग तपासली व आम्हालाही तपासणीच्या चौकटीतुन जावे लागले सगळे सुरळीत झाले . आता फक्त शेवटचा टेबल राहिला होता तेथे पासपोर्टवर शिक्का मारून देतात त्या माणसाने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला " जय हरी महाराज !" अरेच्या ! मी तर चकितच झालो ," तुम्ही मला जयहरी म्हणालात आता मला प्रवासात काही काळजी नाही , म्हणजे इथेसुद्धा जय हरी आहेत तर !" तो म्हणाला ," अहो ! महाराज मी तुमचे फोटो आणि खूपसे लेख फेस बुकवर वाचले आहेत व मी तुम्हाला लगेच ओळखले . अहो आमचा वारकरी !परदेशी जातोय तो तेथे जाऊन भागवत धर्माचा प्रचार करणारच . तुम्हाला प्रवासास माझ्या शुभेच्छा !." मी त्यांना धन्यवाद म्हणालो . मी त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही प्रत्यक्ष बघितले नव्हते पण फक्त फेसबुकच्या मैत्रीचा हा असा धागा जुळला गेला .... ह्या ऋणानुबंधाच्या गाठी असतात . परमार्थ असाही उपयोगाला येतो हे खरे आहे . आमचे हे सर्व कामे ८ वाजेपर्यंत उरकली होती . नारायणाला फोन केला त्याला सांगितले कि " सर्व व्यवस्थित झाले आहे तुम्ही आता गेलात तरी चालेल , " तो म्हणाला तुम्ही विमानात बसल्यावर आम्ही जाऊ ." व्हील चेअरवाल्याने आम्हाला जेथे आमचे विमान येते तेथे आणून सोडले व त्याने सांगितले कि विमान आले कि लगेच अनाऊन्सिंग होईल मग बोर्डिंग पास आणि पासपोर्ट दाखवून तुमच्या जागेवर बसायचे . नेहमीप्रमाणे त्याने आमच्याकडे जरा अपेक्षेने बघितले मी म्हंटले जाऊद्या आता वाद नको शंभर रुपये त्याच्या हातावर ठेवले तो एकदम खुश झाला आम्हाला जय हरी करून गेला . आता आमच्याकडे जवळ जवळ दीड तास होता तेव्हा सौ ला म्हणालो कि आपण आता विमानतळ बघून घेऊ .. आणि क्रमश:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा