परदेशी जायचे म्हटले कि पूर्वतयारी फार महत्वाची . अहो !कुठेही जा पूर्वतयारीशिवाय जाणे काही योग्य नाही . पासपोर्ट तर आलेले होते पण तिकडे जयायचे म्हणजे " व्हिसा" नावाचे एक महत्वाचे प्रकरण आहे . आम्ही TRAVEL MASTERS (MUMBAI) PV - branch pune यांचे मार्फत व्हिसाचे कागदपत्रे देण्याचे ठरवले . त्यासाठी बँक अकौंटची सर्व माहिती , तुम्ही काही एफ डी वगैरे केले असेल तर त्याचे सविस्तर माहिती , घराचा ७/१२ , जमिनीचा ७/१२ , आई डी प्रूफ , हे सर्व आवशक असते आम्ही सर्व कागदपत्रे जमा केली अर्थात आपल्याकडे कोणत्याही कार्यालयात इतक्या सहज काहीच मिळत नसते , तो अनुभव मलाही आला पण ! ते सर्व कागदपत्रे मिळविली आणि मला तर गड जिंकल्यासारखे झाले . सर्व कागदपत्रांचे स्क्यानिंग करून एजंटकडे ई मेलने पाठवली आणि त्यांनी Australian Government, Department of Immigration and Border Protection यांच्याकडे पाठवली ती नेमकी डिसेंबर २०१४ मध्ये सदर केली होती आणि तो महिना नेमका नाताळचा असल्यामुळे आमच्या पथ्यावर पडले , कारण त्यांच्याकडे नाताळ अगदी राष्ट्रीय सण असल्यासारखा असतो त्यामुळे लवकरच व्हिसा मंजूर झाला . २४ डिसेंबर २०१४ ते २४ डिसेंबर २०१६ पर्यंत आम्हाला दोन वर्षाचा व्हिसा मंजूर करण्यात आला .
आमची तर तयारी झाली अगदी मी माझ्या मित्र मंडळीला पण सांगितले कि आम्ही आता लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहोत . परंतु नेमके काही अडचणी उभ्या राहिल्या " श्रेयांसि बहु विघ्नानि " आणि आमचे ऑस्ट्रेलियाला जाणे लांबले. मन फार खिन्न झाले पण नाईलाज होता . वेळ आल्याशिवाय काहीच घडत नाही हेच खरे . मनात असेही वाटले कि आपले काही जाणे होत नाही . पण गणेश म्हणायचा " अण्णा तुम्हाला यावेच लागेल , तुम्ही तसे काही वाटून देवू नका " मनात इतके ठरवूनही जर ठरवलेले घडले नाही तर फार मनस्ताप होतो . आणि वाट पाहणे हे तर फार त्रासदायक . जवळ जवळ ७-८ महिने असेच गेले आणि गणेशाचा फोन आला तो म्हणाला ," आण्णा ! मी तुमचे टिकेट बुकिंगसाठी एजंटला सांगितले आहे . आता तुम्ही तयारीला लागा …… " मग मात्र पुन्हा हुरूप आला पण यावेळी ठरवले कि प्रत्यक्ष विमानतळावर गेल्याशिवाय कोणालाही काही बोलायचे नाही . आमचे तिकीट सुद्धा कन्फर्म झाले .२६ ऑक्टोंबर २०१५ ते रिटर्न ७जानेवारी २०१६ . मुंबई ते सिंगापूर जेट एअरने व तेथून पुढे quantas एअरलाईनने मेलबोर्न पर्यंत असा एकदंदर १४तासांचा प्रवास . या दोन विमान कंपनीचा करार असल्यामुळे असा हा ब्रेक जर्नी . तिकिटे ऑन लाईन मिळाली . आता खरी आमची लगबग सुरु झाली .
परेदशी राहायचे म्हटल्यावर त्याप्रमाणे कपडे घेणे आले अगदी ३/४ , टी शर्ट , सुटकेस औषधे , नेहमी लागणारे पदार्थ अर्थात कुठल्याही प्रकारचे " बीज " असलेले पदार्थ तिकडे नेता येत नाहीत , बुटाची माती सुद्धा साफ केलेली असावी लागते laptop , व्हिडीओ क्यामेरा , मोबईल काही मिठाई व खाण्याचे पदार्थ असे सगळे यादीप्रमाणे झाले . प्रत्येकी २७ किलो वजन सुटकेसमध्ये अलाउड (मंजूर) होते laptop ची ब्याग आणि पर्स त्या वजनात धरीत नाही हे तुम्हाला जवळ ठेवता येते . बाकी मोठी सुटकेस त्यांच्या ताब्यात असते ती विमानात लगेजमध्ये सुरक्षित असते .
जस जसे दिवस जवळ येत चालले तस तसे मनात कुठेतरी हुरहूर वाटायला लागली . हृदयात आपली मातृभूमी सोडून जाण्याचे अनामिक दुख: सुधा वाटायला लागले नातेवाईक व पारमार्थिक प्रेमी लोक सगळे भेटायला येऊ लागले आणि उगीचच भावनाशीलता होऊ लागली , डोळे भरून यायचे पुन्हा सगळ्यांच्या भेटी होतील का ? विमानाचे अपघात वगैरे ऐकत आलेलो असल्यामुळेहि असे काहीतरी उगीचच वाटायला लागले अर्थात हा मनाचा एक खेळच …" मन चिंती ते वैरी न चिंती " हे म्हणतात ते खरे आहे .
क्रमश:
ता क : ऑक्टोंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत मी ऑस्ट्रेलियात भरपूर प्रवास केला आणि त्या देशातील निसर्ग ,जंगल , समुद्र , प्राणी, पक्षी , लोक, शासन, आधुनिक संशोधन , तेथील संस्कृती, तेथील भारतीय संस्कृती याचे सविस्तर वर्णन करून " देश वेष नोहे माझा " या बॉल्ग द्वारे आपल्यासाठी सादर करीत आहे . आपले बहुमोल अभिप्रायाच्या प्रतिक्शेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा