शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

मेलबर्न- गणेशच्या घरी

               मेलबर्न- गणेशच्या घरी







              
       मेलबर्न एअरपोर्टवर उतरलो , ते भव्य विमान तळ बघून जरा उर दडपल्यासारखे झाले ... आतमध्ये सगळे वातावरण थंड आणि उंच शरीर यष्टीचे पोलीस बघितले लगेच तेथील कडेकोट बंदोबस्त लक्षात आला. आम्हाला आता आमच्या ब्यागा ताब्यात घ्यायच्या होत्या .  आतमधून सर्व वळणावळणाचे रस्ते लक्षात येत नव्हते पण आम्ही एक केले ते म्हणजे आमच्या विमानात जे प्रवासी होते त्यात काही मुंबईहुन बसले होते त्यांच्या मागोमाग गेलो आणि तळमजल्यावर एका गोलाकार चक्रावर ब्यागा फिरत होत्या प्रत्येक बॅगेला एक ट्याग असतो त्यावर तुमचे नाव असते आमच्या बॅगा ओळखून पटकन उचलून घेतल्या आणि पुढे  जाण्यासाठी निघालो मला वाटले आता लगेच आपण बाहेर पडणार परंतु तसे इतके सोपे नव्हते. शिवाय बाहेर गणेश आला कि नाही हे अजून निश्चित झाले नव्हते .... नंतर गणेशाचा फोन आला तो म्हणाला मी बाहेरच उभा आहे काही काळजी करू नका . परत एकदा बॅगा तपासतील आणि मगच तुम्हाला बाहेर पडता येईल . आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो पुढेच एक महिला पोलीस आणि तिच्या हातात एका अल्सेशियन कुत्र्याचा बेल्ट , ते कुत्रे प्रत्येक प्रवाशाचा आणि त्याच्या बॅगेचा वास घेत होते. आमच्याजवळ काहीच संशयास्पद नव्हते तरीही एक अनामिक भीती वाटत होती . तेव्हढ्यात त्या कुत्रे आमच्या पुढील एका महिलेच्या जवळ जाऊन बसून राहिले लगेच त्या महिला  पोलिसाने त्या महिलेला बाजूला घेतले आणि तिची बॅग तपासली तर त्यात काही नव्हते फक्त दोन सफरचंद सापडले. तेव्ह्ड्यावरून त्या स्त्रीला त्यांनी धारेवर धरले , ती रडायला लागली आणि परोपरीने सांगत होती कि हे चुकून आले पाहिजे तर मी आटा फेकून देते, पण ते सेक्युरिटी काही ऐकेना त्यांचे म्हणणे असे कि आमच्या देशात अशा पद्धतीने दुसऱ्या देशातील फळे आणणे योग्य नाही कारण त्यातून सुद्धा प्रदूषण होऊ शकते . शेवटी २५०/- डॉलर दंड करून सोडून देण्यात आले . अगदी कडेकोट सुरक्षा आणि तपासणी एका दृष्टिने ते बरोबर आहे . ते बघितल्यावर आपल्याकडची ढिसाळ व्यवस्थापन आठवले.
          आम्ही त्या तपासणीतून सहीसलामत सुटलो आणि बाहेर पडलो ट्रॉलीवर बॅगा घेऊन रोडच्या गेटवर आलो पण गणेश कुठे दिसेना . ओळखीचे कोणी नाही , तेथील लोंकांचे इंग्रजी आम्हाला कळेना आणि आमचे त्यांना  .. परत गणेशाचा फोन आला मग जीवात  जीव आला तो म्हणाला तुम्ही आहे तिथेच उभे राहा मी बरोबर तिथेच येतो . गणेश आमच्याकडे आला आणि त्याने आमच्या हातातली ट्रॉली घेतली आणि रोड  क्रॉस करून पलीकडे गेलो तिथे गणेशाची गाडी उभी होती आणि तिथेच सौ नीता ( गणेशाची पत्नी, आमची स्नुषा ) उभी होती आणि कबीर तिच्या  कडेवर होता .  मला बघितले आणि कबिरने माझ्याकडे झेप घेतली  त्याचे निरागस हास्य आणि तो प्रेममय स्पर्श अश्रूंच्या रूपाने वाहू लागला. नातवाचा स्पर्श स्वर्गसुखापेक्षा अधिक असतो नंतर कबीर आज्जीकडे गेला त्याच्या प्रेमाने आज्जीला सुद्धा प्रेमाश्रू अनावर झाले आणि काहीही असले तरी आपण भारतीय आहोत हे सर्व असे झाल्याशिवाय मजा नाही .
           सर्व सामान डिकीत टाकले आणि आम्ही गणेशाच्या घरी निघालो सिटीमध्ये प्रवेश करतांना एक फ्लाय ओव्हर आहे त्यावर आम्ही चाललो होतो तेवढ्यात पाठीमागून एका कारने  आमच्या गाडीला धडक दिली आणि पाठमागच्या कारला  एका ट्रेलरने धडक दिली . मला तर असा राग आला गणेशाला मी म्हणालो मी उतरू काय खाली ? तो म्हणाला "अण्णा तुही उतरायची आवश्यकता नाही इथे सर्व समजदार लोक असतात. " गणेश खाली उताराला विशेष म्हणजे कोणीही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही मागच्या कारमध्ये ड्राइवर एक महिला होती तिने गणेशाची माफी मागितली व पाठीमागचा ट्रेलरचा ड्राइवर आला आणि सर्वांनी समजूतदारपणाने घेतले पोलिसाला फोन केला, इन्शुरन्स कंपनीला फोन केला व सर्व प्रक्रिया अर्ध्या तासात झाली . इन्शुरन्स कंपनीने गणेशाला एक दुसरी कर स्ट्यांड बाय म्हणून देण्याची तयारी दाखवली. त्याने तशी गरज नसल्याचे सांगितले. आणि आम्ही थोड्याच वेळात गणेशच्या घरी पोहचलो आणि छानपैकी शावरखाली गरम पाण्याने अंघोळ केली ..... आणि जेवण केले व थकवा सुद्धा खूप आला होता तेव्हा आमच्याकरिता असलेल्या रूममध्ये आरामासाठी प्रवेश केला.
   

गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

आणि मेलबर्नला पोहचलो .







 जेवण छानच होते . मधून अधून हवाई सुंदरी येऊन विचारायच्या .. hello sir ! do you want cold drink or whisky . " No , thanks but my wife wants a juice ." OK sir !  आणि तिने सौभाग्यवतीला एका ग्लासमध्ये ज्यूस दिला . ज्यूस घेताना सौ म्हणाली कि " पुराणामध्ये १४ भुवने सांगितली आहेत ते खरेच आहे म्हणावे लागेल .
 " तुला आता  एव्हढ्या उंचीवर त्याची काय आठवण आली ? "
 अहो! तसे काही नाही पण पृथ्वी सोडून आपण इतक्या उंचीवर आलो  आहोत आणि वरती आणखी किती उंच आहे हे काही आपण सांगू शकत नाही . पण जनाबाईचा अभंग फार छान आहे त्यात तिने सांगितले कि " इंद्र चंद्र दाळिले सप्तपाताळासहित " । खालचे सात आणि वरचे सात म्हणजे एकूण चौदा झाले ........ "
 मी तिला म्हणालो " जनाबाईने तर सांगितले गोष्ट खरी आहे पण तुकाराम महाराजांनी पण या ब्रह्माण्डाचे वर्णन केले आहे ते म्हणतात " उंबरातील कीटका।हेचि ब्रह्माण्ड ऐसे लेखा ।। ऐसी उंबरे किती झाडी । ऐसी झाडे किती नवखंडी ।। तात्पर्य या ब्रह्माण्डात किती ग्रह , तारे, नक्षत्र आहेत हे आपण सांगू शकत नाही थोडक्यात ते अगणित आहेत . त्यातला आपण कितीवा भाग आहोत काही सांगता येईल का ? नाही सांगता येणार ... आपले स्थान नगण्य आहे असेच वाटते . "
            अशीच चर्चा  काही वेळ झाली आणि तात्विक विचारातून बाहेर आलो . व समोरच्या आसनाच्या मागच्या बाजूला एक स्क्रीन असतो , आमच्या हातात खूप वेळ होता त्या स्क्रीनवर वेगवेगळे पर्याय असतात .मी आपले एक पर्याय निवडाला त्यामध्ये सर्व जुने पिक्चर्स होते १९७६ नंतर मी थियेटरमध्ये सिनेमा बघितलाच  नव्हता त्यानतंर आता विमानात वेळ खूप होता आणि दुसरे काहीही काम नव्हते म्हणून म्हंटले संधीचा फायदा घेऊयात व एक जुना सिनेमा बघितला . वनंतर  एक झोपेचा डुलकी घेतली जरा बरे वाटले .
                     साधारणपणे दुपारी ४. ०० च्या दरम्यान आमचे विमान ( हे जेट कंपनीचे होते ) सिंगापूरला उतरले . मला व्हील  चेअर मंजूर केलेली असल्यामुळे सिंगापूरचे कर्मचारी हातामध्ये माझ्या सीटचा  नंबर व नाव असलेला बोर्ड घेऊन जिन्यातच उभे होते . मला फार बरे वाटले कारण एक तर तिथली भाषा माहित नाही व इंग्रजी त्यांचे समजत नाही . बॅटरीवर चालणाऱ्या गाडीत आम्ही बसलो आणि त्या चालकाने आम्हाला जिथे आमचे मेलबर्नचे विमान लागते तेथे आणून सोडले आता काळजी नव्हती . आम्हाला काही फ्री कुपन्स मिळाली होती , मी  त्याचा वापर तरी करू म्हणून एका कॉफीच्या दुकानावर गेलो त्यांना ते कुपन दाखविले पण त्याने ते इथे चालत नाही , दुसरीकडे आहे असे इंग्रजीत  सांगितले अर्थात मी ते अंदाजाने समजून घेतले व मोडक्या तोडक्या इंग्रजीत त्याला मी,हणालो कि मला कॉफी घ्यायची आहे किती पैसे लागतील ? त्याने दोन सिंगापूरचे ङोलर सांगितले मी म्हणालो " माझ्याकडे ऑस्ट्रेलियन डॉलर आहेत " ते तिथे चालतात म्हणाला आणि मी दोन कॉफी घेतल्या , ऑस्ट्रेलियन ङोलर दिले त्याने सिंगापूरच्या डॉलरची वसुली करून बाकीचे मला परत दिले . कॉफीचा आस्वाद घेतला . चंगाई (changi  airport ) विमानतळ अतिशय सुंदर आणि भव्य आहे ते बघण्यासारखे आहे . आणि आम्ही मी तिथे जवळ जवळ दोन तास वेळ होता नंतर तेथून क्वांटस एअर लाईनचे विमान होते त्याला अजून वेळ होता . आम्ही सिंगापूरचे हे विमातळ बघून घेऊ म्हणून आतल्या आत बरेच फिरलो इथे सरकते जीने  ,लोकांची लगबग व चिनी लोकही बरेच दिसले त्यांची ती भाषा चिव चिव केल्यासारखी मजेशीर वाटत होती . आतमध्येच एक छोटीसी रेल्वे आहे त्यात दूरवरच्या टर्मिनलवर जायचे असल्यास या रेल्वेचा लोक वापर करतात . सर्वत्र वेगवेगळ्या वंशाचे , देशाचे लोक दिसत होते . भाषा काही समाजात नव्हती तो हि एक वेगळाच आनंद होता . तिथे पायाचा मसाज करणारे मशिन्स आहेत लोक विमानात प्रवासी बसून थकून जातात त्यांचाकरीत हि सोय. शिवाय वाय फाय व्ययस्था पण फ्री . आतमध्ये सुंदर बगीचे आहेत व त्यात वेगवेगळे प्रकार आहेत . काही ठिकाणी छानसे विपुल प्रमाणात फुलपाखरे आहेत . वेगवेगळे स्टोल पण वस्तू जरा महाग वाटल्या किंबहुना आपल्याला त्यातील काही कळत नाही आणि उगीचच त्या फंदात पडायला नको . मेलबर्नला गेल्यावर काय घ्यायचे ते घेऊ असा विचार करून आम्ही परत आमच्या जागेवर आलो आणि लगेच घोषणा झाली कि मेलबर्नला जाणारे विमान लागले आहे . पुन्हा आमचे पासपोर्ट व ल्यापटॉपची बॅग व हॅन्ड बागा चेक झाल्या आणि विमानात आत गेलो अहाहा ! काय ते स्वागत आणि विमानातील सुंदर व्यवस्था ..२ X २ च्या चेअर होत्या आम्ही आसनस्थ झालो क्रू आणि त्यांचा सर्व स्टाफ एका विशिष्ट ड्रेसमध्ये होता आणि अत्यंत अदबीने व नम्रतेने सर्व प्रवाशांची काळजी घेत होते. जवळ जवळ २५० प्रवासी होते . हे विमान जरा आकाराने थोडे मोठे होते. २X २ च्या तीन लाईनी होत्या . वेगवेगळे लोक होते . आमच्या पलीकडच्या सीटवर एक सिड्नीचे ऑस्ट्रेलियन जोडपे बसले होते . मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला अर्थातच इंग्रजीमध्येच , जमले बुवा कसे तरी !! त्या माणसाने मला विचारले कुठे जाणार ..... वगैरे वगैरे .. मी त्याला विचारले तुम्ही कुठे गेला होता त्याने सांगितले कि" मी भारतात गेलो होतो , आग्र्याला गेलो होतो तेथील ताजमहाल बघितला आणखी बरंच काही . गुजरातला पण जाऊन आलो म्हणाला व सुरतला पण गेलो होतो म्हणाला मला एकदम लक्षात आले कि अरे हो ! सुरतला साड्या स्वस्त मिळतात , पण या स्त्रियांना त्याचा काय अप्रूप कारण या सर्व फ्रॉक घालणाऱ्या स्त्रिया . तरीही मी त्याला सहज विचारले कि " तिथे साड्या छान आणि स्वस्त मिळतात तुम्ही बघितले का ते ?"  यावर तो माणूस वैतागून म्हणाला यांनी त्याच दुकानात इतका वेळ घालवला मी कंटाळून गेलो होतो व माझ्या बायकोने बऱ्याच साड्या घेतल्या आहेत . " अरे वा ! जगातील सर्व स्त्रियांना कपड्याचे आकर्षण आहेच म्हणायचे तर !
                     रात्रीचे जेवण सुदंर होते शाकाहारात पण सुंदर प्रकार होते , जेवणाबरोबर सलाड होते , दूध, दही ,पनीर असे पौष्टिक जेवण होते . ...... जे मांसाहारी आहेत त्यांच्याकरिता सर्व प्रकारचे मांस मिळत होते बीफ हवय का म्हणून तेहि  प्रवाशांना  विचारातही होते . तुम्ही बीफवर जरी बंदी घालण्याचा विचार करीत असाल तरीही विमानात मात्र ती बंदी नाही कारण त्यांना सर्व प्रकारचे प्रवासी हवे आहेत व "पिंडे पिंडे मतिर्भिन्न:।। " रात्रीचे दहा वाजून गेले आहेत पण झोप काही येत नव्हती पहिलाच विमान प्रवास आणि त्याचे आम्हाला मोठे अप्रूप वाटत होते  नंतर  शाल अंगावर घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला . बाहेर तर सगळा अंधार दिसत होता . झोप लागली आणि पहाटे लवकरच जाग आली समोरच्या स्क्रीनवर नकाशा सुरु केला आणि बघितले तो काय पहाटेचे  ५. ३० वाजले होते व मेलबर्न जवळ आले  होते .. खिडकीतून बाहेर बघितले तर काय सांगावे इतके दृश्य सुंदर होते कि विचारू नका !!! पहाटेच्या वेळी काळ्या पार्श्वभूमीवर पूर्वेला छानसा लाल पिवळा सोनेरी पट्टा क्षितिजावर चमकत होता आणि मेलबर्न आल्याची खात्री पटत होती . सौ ला उठवले आणि हे दृश्य दाखवले आम्हाला आता कधी एकदा मेलबर्नला उतरतो असे झाले होते . पायलटने अनाऊन्सिंग केले कि आता थोड्याच वेळात आपण मेलबर्न विमान तालावर लेन्डिंग करणार आहोत , सगळ्यांनी बेल्ट व्यव्यस्थित बांधा . मनामध्ये खूप खळबळ होती , उत्सुकता होती गणेश , सहकटुंब आम्हाला घ्यायला आला असणार कधी एकदा त्याला भेटतो असे झाले होते ........ याच विचारात असतांना विमान अलगद जमिनीवर उतरले आणि आम्ही ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाय ठेवले .

क्रमश:
अशोकानंद महाराज कर्डीले

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

आणि विमान आकाशात झेपावले









        मुंबई विमान तळावर आमचे सर्व कागपत्रांचे सोपस्कार संपले आमच्या हाती थोडा वेळ होता तेवढ्या वेळेमध्ये आम्ही आमच्या मोबाईलसाठी एक आंतरराष्ट्रीय सिम विकत घ्यायचे ठरविले आणि एका सीमच्या स्टालवर गेलो चौकशी केली तेव्हा कळले कि एका सिमला २५००/- रुपये लागतात मी थोडी कमी जास्त करण्याची विनंती केली आणि त्याने ५००/- रुपये कमी केले ते सिम २०००/- रुपयाला मला दिले पण पावती दिली नाही , त्याने मला सांगितले कि तुमचा मेल आय डी द्या मी तुम्हाला मेल करिन . ठीक आहे म्हणालो पण तुम्हाला सांगतो कि मला अद्यापर्यंत त्याचा मेल आला नाही मी ओळखून घेतले कि आपण फसवले गेलो आहोत. असो पण ते सिम कार्ड मात्र चालू होते , हेही नसे थोडके . " ये मेरा इंडिया "
                 वेगवेगळे वस्तूंचे स्टोल बघितले आणि सहज किमती विचारल्या तर त्या सर्व आवाक्याबाहेरचं वाटायला लागल्या आणि त्याच वस्तू बाहेर खूप स्वस्त होत्या. असो सर्व विमान तळ एअर कंडिशन असल्यामुळे , त्याचीही वसुली आणि लोक परदेशी जातात त्यामुळे वस्तूंच्या किमती सुद्धा वाढत असाव्यात अशी मनाची समजूत करून घेतली . सौ. ला म्हणालो ," आपण आता चहा आणि थोडा फार नाश्ता  करू ." आणि आम्ही तेथील एका हॉटेलमध्ये गेलो नेहमीप्रमाणे वेटरला चहा सांगितला , त्याने आमच्याकडे बघितले जवळ येऊन म्हणाला येथे एक चहा १५०/- ला आहे आणू का ? मी सौ कडे बघितले काय करायचे ? चहा घ्यायचा का ? ती नको म्हणाली , मी म्हणालो "जाऊ दे घेऊ आपण चहा घेऊ तेवढीच आठवण !" ..... आणि घेतला चहा . पहिल्यांदा इतक्या महागाचा चहा पिलो !! नाश्त्याला काय आहे विचारले तर तो म्हणाला पुरीभाजी आहेकिती पैसे ? त्याला विचारले तो म्हणाला  " ३००/- रुपये फक्त " असो  सौ ला म्हणालो  नाश्ता  करूया हे सुद्धा आपल्या स्मरणात राहील . आम्ही चहा नाश्ता केला आणि एन्जॉय केला . नंतर जेट एअरलाईनच्या काउंटर जवळ जाऊन बसलो . .. २० ला अनाऊन्सिंग झाले आणि प्रवासी एका लाईनींत उभे राहिले आम्ही सुद्धा त्याच लाईनमध्ये उभे राहिलो काउंटरवरील सुटाबुटातील अपटुडेट माणसाला आम्ही आमचे तिकीट पासपोर्ट दाखवले आणि विमानाला जोडलेल्या एअर कंडिशन जिन्यातून विमानाच्या दरवाज्यापर्यंत गेलो तिथे तीन चार हवाई सुंदरी अगदी हसत मुखाने " वेलकम " म्हणत स्वागत करीत होत्या . आपल इतक रुबाबात कोणी स्वागत करतंय हाच एक सुखद अनुभव होता . आम्हाला आमचे आसन दाखवले अगदी खिडकीशी चेअर बुक केलेल्या होत्या x सीट होत्या प्रथम मी खिडकीजवळचे सीटवर बसलोनंतर मात्र सौ ने  खिडकीजवळच्या सीटचा ताबा घेतला. बाहेरचे दृश्य बघण्याची उत्सुकता आम्हा दोघानाही होतीच . नंतर



मी मधल्या सीटवर बसलो आणि माझ्या शेजारी एक मध्यम वयीन ऑस्ट्रेलियन गृहस्थ बसले . विमानात बरेचसे परदेशी लोक होते भारतीय लोक सुद्धा बऱ्यापैकी होते . योगेशला फोन लावला आणि सांगितले आम्ही आता विमानात बसलो आहोत तुम्ही निघालात तरी चालेल , नारायण, सौ पूजा यांच्याबरोबर बोललो पण बोलताना पुन्हा कंठ दाटून येताच होता. तिघांचा निरोप घेतला. 
                पायलटने  घोषणा केली कि आता अगदी पाचच मिनिटात विमान सुरु होईल सर्वांनी बेल्ट बांधून घ्या , आपापले मोबाईल बंद करा किंवा फ्लाईट मोडवर ठेवा आणि लगेच एका हवाई सुंदरीने बोलायला सुरवात केली आणि बेल्ट कसे बांधायचे , अडचणीच्या वेळी आपल्या डोक्यावरच असलेला प्राणवायूचा  मास्क कसा वापरायचा , संकट काळी कोणत्या दरवाज्याने बाहेर जायचे ते हि दाखवले दुसऱ्या एका हवाई सुंदरीने प्रत्येकाला छानशा मऊसूत शाली आणि हेड फोन दिले त्यांच्या कंपनीची विमानाची माहिती असलेले एक सुंदर पुस्तक दिले त्याचबरोबर चॉकलेट दिले आणि घोषणा केली कि आता विमान उड्डाण करणार आहे
                इंजिनाची घरघर सुरु झाली आणि विमान रनवेवर धावू लागले हळू हळू वेग घेतला आणि ......... विमान अलगद वर उचलले गेले  , विमान आकाशात झेपावले पृथ्वीचा संपर्क सुटला  त्यावेळी मात्र पोटात खड्डा पडल्यासारखे झाले खरे पण ते अगदी थोडा वेळ . विमान उंच म्हणजे जवळ जवळ दोन हजार फूट उंच गेले . खिडकीतून मुंबई मोठी मनोहर दिसत होती विशेष म्हणजे झोपडपट्टी अगदी स्पष्ट दिसत होती मनाला ते पाहून वाईटही वाटत होते . " नरेचि केला किती हीन नर " हि केशवसुतांची उक्ती आठवली . आता विमानाने जवळ जवळ ८००० फूट उंची गाठली , खाली काहीच दिसत नव्हते, दिसत होते ते फक्त निळेशार आकाश आणि फक्त पांढरे शुभ्र ढगांचे पुंजके .  प्रत्येकाला समोर स्क्रीन असतो त्यात तुम्ही सिनेमा , मालिका,  व विमानाची सद्यस्थिती पाहू शकता . पण ! मी मात्र एव्हड्या उंचीवर " ज्ञानेश्वरी पारायण " सुरु केले सौ ने विचारले" काय करताय ?" तिला म्हणालो " आयुष्यात  परत इतक्या उंचीवर येईल कि नाही सांगता येत नाही म्हणून मुद्दाम येथे आकाशात ज्ञानेश्वरी पारायण करून घेतो व एव्हड्या उंचीवर गेलो तरी माउलीला विसरलो नाही हा हि एक आनंद वेगळाच .  विमानाचा स्पीड आता तशी ९०० कि मी होता पण आत काहीही जाणवत नव्हते . हवाई सुंदरी मधेच काही तरी कोल्ड ड्रिंक , देत होत्या व स्न्याक्स वगैरे देऊन दुपारचे गरमागरम जेवण आले आणि " अन्न हे पूर्ण ब्रह्म " जाणून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. 
 क्रमशः: